Wednesday, August 30, 2017

चंदेरी दुनियेत – लीला चिटणीस


लीला चिटणीस म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर येते ती परिस्थितीने गांजलेली, नवर्याचा मृत्यू झाल्याने किंवा त्याने सोडून दिल्याने मुलांना एकटीने कष्ट करून वाढवणारी, त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी,पण सदोदित रडणारी आजारी आई. ह्या अभिनेत्रीने कधीकाळी नायिकेच्या भूमिका केल्या होत्या, नाटकातून कामं केली होती हे वाचून मला बराच धक्का बसला. अर्थात अशोककुमारचा 'महल' पाहिल्याची चूक केल्याने कंगन. बंधन आणि झुला हे ते तिन्ही चित्रपट कधी बघायची वेळ आलीच तर जवळ एक बामची बाटली घेऊन बसावं लागणार ह्याची खात्री आहे :-) पण तरुणपणीच्या लीलाबाई दिसतात तरी कश्या आणि अभिनय कसा करतात ते पाह्यची मोठी उत्सुकता मात्र हे पुस्तक वाचून लागली आहे. तेव्हा ह्यातला एखादा तरी चित्रपट बघणं 'बनता है'.

हे पुस्तक फक्त त्यांच्या आयुष्याची कथा नाहीये तर त्यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द, त्यात त्यांना आलेले अनुभव, त्यांचं व्यक्तिगत जीवन, स्वतंत्र होण्याआधीच्या भारतातलं जीवन, त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी, तेव्हाच्या काळात बनणारे चित्रपट, त्यात काम करणारे दिग्दर्शक, निर्माते, नायक, नायिका, चरित्र अभिनेते, एक्स्ट्रॉज, गीतकार, संगीतकार, केमेरामन, बाकी तंत्रज्ञ, तेव्हाची टेक्नोलॉजी, शुटींगमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात, तेव्हाच्या चित्रनिर्मिती संस्था (प्रभात, बॉम्बे Talkies) , चित्रपटांचं वितरण, प्रदर्शन असा एक विस्तृत पट त्यातूनआपल्यासमोर उलगडतो. उदा. त्या काळातले चित्रपट पाहताना मध्येमध्ये कंटिन्यूइटीची गोची झालेली आढळते ते पाहून हसू येतं. पण ही कंटिन्यूइटी सांभाळण्याचं काम किती जिकिरीचं आहे ते हे पुस्तक वाचून ध्यानात येतं. एक चित्रपट, मग तो कितीही टुकार का असेना, बनवायचा तर किती लोकांचे श्रम लागतात ते वाचून तर भारतात इतके चित्रपट तेव्हा बनत होते हयाचंच आश्चर्य वाटतं.

लीलाबाईच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलायचं झालं तर नवर्याच्या देशप्रेमाने भारून गेलेल्या कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या साध्या गृहिणीकडून एक प्रथितयश अभिनेत्री, घटस्फोटिता ते लिव्ह-इन रिलेशनशीप मध्ये रहाणार्या स्त्रीपर्यतचा प्रवास आश्चर्यकारक आहे. अगदी 'हीच का ती स्त्री' असं वाटण्याइतपत. खरं तर हंसाबाई काय किंवा लीलाबाई काय, पण ह्या चित्रपटसृष्टीच्या मोहमयी दुनियेत वावरणाऱ्या लोकांचे संसार सुखाचे का होत नाहीत हे कोडं आहे.

तरी एक प्रश्न पडतोच. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खास स्त्रीप्रधान भूमिका बनायला आत्ता आत्ता सुरुवात झाली आहे. तेव्हाच्या काळात तर त्या असणं अशक्यच. त्यामुळे एक ठराविक वय ओलांडल्यानंतर स्त्री अभिनेत्रीला आई/सासू अश्याच भूमिका करणं क्रमप्राप्त होतं. पण त्याच त्याच चाकोरीतल्या गरीब आईच्या भूमिका करताना लीलाबाईमधल्या अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया होती?

केवळ एका अभिनेत्रीच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल नव्हे तर ३० ते ७० सालातल्या हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असलेल्यांनी नक्कीच वाचावं असं हे आत्मचरित्र आहे.

No comments: