Saturday, November 19, 2016

आजकाल एफएम ऐकणं जवळपास बंद झालंय. ऐकते तेव्हाही शक्यतो गोल्डन एरामधली गाणीच ऐकते त्यामुळे नव्या हिंदी पिक्चरमधल्या गाण्यांशी फारसा संबंध येतच नाही. पण काही दिवसांपूर्वी एका संगीतवेड्या मित्राला ह्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याने ७-८ गाणी पाठवून दिली. त्यातलं 'सुनो ना संगेमर्मर' अतिशय आवडलं. मग काय? रात्री झोपताना ऐकण्याचा परिपाठ झाला. त्याआधी त्याने पाठवलेलं 'बंजारा' सुध्दा बेहद्द आवडलं होतं. 'कोई मुझको यू मिला है जैसे बंजारेको घर' ह्या ओळीवर तर मी जाम फिदा झालेय.

नवी मराठी गाणी सुध्दा मी शक्यतो ऐकत नाही. पण ह्याच मित्राकडून हक्काने 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' मागून घेतलं होतं. तेही आवडत्या गाण्यांपैकी एक झालंय.

ही पारायणं होईतो "'ऐ दिल है मुश्कील' चं title song ऐकलंस का?" अशी पृच्छा झाली. चेनेल सर्फिंग करताना कुठल्या तरी सिरियलमध्ये लागलेलं ऐकलं होतं पण पूर्ण गाणं डाऊनलोड करून नव्हतं घेतलं. 'नाही' म्हटल्यावर तेही गाणं फोनमध्ये येऊन पडलं. तरी काही दिवस ऐकायला वेळ नाही झाला. मग एके रात्री झोपताना ऐकलं आणि अक्षरश: प्रेमात पडले गाण्याच्या. 'मोहताज मंजीलका तो नही है ये एकतर्फा मेरा सफर, सफर खुबसुरत है मंजीलसे भी'. फिदा फिदा फिदा!

आणि मग २-३ दिवसांपूर्वी चेनेल्स बदलता बदलता दिसला म्हणून बाकीची कामं करत करत '१९२० लंडन' पाहिला. '१९२०' पेक्षा बराच बरा वाटला. निदान भुताचे चित्रविचित्र चेहेरे दाखवले नाहीत म्हणून असेल कदाचित. त्यातलं जवळपास शेवटचं 'आज रो लेन दे' आवडलं. ते डाउनलोड करायला गेले तेव्हा '१९२०' मधलं 'वादा तुमसे है वादा' डाऊनलोड करायचं राहिलं होतं ते लक्षात आलं म्हणून तेही डाऊनलोड केलं.

त्यामुळे आजकाल झोपताना माझी अंगाईगीतं म्हणजे 'बंजारा', 'सुनो ना संगेमर्मर', 'ऐ दिल है मुश्कील', 'वादा तुमसे है वादा' आणि 'आज रो लेन दे'. मज्जानु लाईफ!!

No comments: