Thursday, September 15, 2016

उत्सवाची इव्हेंट झाली की काय होतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले गणेशोत्सव आणि जन्माष्टमी हे सण. लोकमान्य टिळक इथे आले तर आपण गणेशोत्सव का सुरु केला असं त्यांना वाटावं अशी स्थिती आहे. एक तर लोकांनी एकत्र येऊन सण साजरा करावा हे ह्यामागचं एक कारण. पण आज गल्लीच्या ह्या टोकाला एक गणपती, मध्ये काही आणि दुसर्या टोकाला आणखी एक. गल्लोगल्ली डेंटिस्ट दिसतात तसे गणपती दिसतात भाद्रपदात. सगळे गणपती आपापल्या गल्लीचे "राजे", सगळे नवसाला पावणारे. दर्शनाला जावं तर लेटेस्ट बॉलीवूड हिट्स आपलं आणि बाप्पाचं मनोरंजन करायला दणादण वाजत असतात. आपले दोन छोटे कान तर एव्हढा त्रास होतो मग लंबकर्ण बाप्पाची काय अवस्था होत असेल तोच जाणे. देवापुढे सगळे सारखे पण बड्या धेंडांना किंवा पैसे घेऊन इतरांना आधी दर्शन करू देणे हे तर आता नेहमीचंच झालंय. आता भरीला पोलिसांशी हुज्जत घालणे, त्यांना शिवीगाळ किंवा मारहाण करणे हेही चालू झालंय. आजच्या पेपरात लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाबद्दल छापून आलंय. देवाची सेलेब्रिटी झाली की ह्या कार्यकर्त्यांना आपणही थोर झाल्याचा साक्षात्कार होतो.

विसर्जनाची तर अजून वेगळी तऱ्हा. दारू पिऊन विसर्जनाला जाण्यामागे काय कारण असू शकतं हे मला अजूनही कळलेलं नाही. मग तिथे महिलांना उद्देशून अचकटविचकट शेरे मारणे, पोलिसांना शिवीगाळ किंवा मारहाण करणे, मारामारी करणे हे ओघाने आलंच. अरे उत्सव काय, आपण करतोय काय, समोर आपल्या दैवताची मूर्ती उभी आहे निदान हे तरी भान ठेवा. तरी बरंय २-३ वर्षांपूर्वी असल्या तळीरामांना समुद्रात जेलीफिशचा प्रसाद मिळाला होता. एखादा तास त्रास व्हायचा तो मदिरेच्या प्रभावामुळे औषधांचा परिणाम न होऊन जास्त त्रास भोगावा लागला. तरी ह्या वर्षी अक्कल आली असेल अशी आशा करण्यात अर्थ नाही. विसर्जनासाठी आलेल्या लोकांनी समुद्रकिनाऱ्यावरच जेवून टाकलेल्या थर्मोकोलच्या प्लेटीचा ढीग उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचा फोटो आजच पेपरात छापून आलाय. काय बोलायचं? आता पोलिसांनी लोक असे जेवताना दिसल्यास कारवाई करून त्यांना भक्कम दंड आकारावा. पैसे भरायला लागले म्हणजे डोकं ठिकाणावर येईल. आम्हा भारतीयांना खिश्याला चाट पडली कीच अक्कल येते. एरव्ही आम्ही गाढवाला लाज वाटेल एव्हढे ढिम्म असतो.

परवा एफएम ऐकताना ९२.७ वरचे आरजे मोठ्या अभिमानाने आम्ही लालबागच्या राजाचे मिडिया पार्टनर्स आहोत असं सांगत होते. दुसरं कुठलं तरी चेनेल 'अंधेरीचा राजा' चे मिडिया पार्टनर्स आहेत म्हणे. दिवसभर त्यांचे आरजेज दर्शनाला येणाऱ्या भक्तांना धरून त्यांना देव कसा पावला वगैरे किस्से ऐकवत असतात. त्यातून वेळ मिळाला तर गाणी ऐकवतात. गणपतीला मिडिया पार्टनर्स लागतात ही माहिती नवीन आहे. अजून काय काय बघायला लागणार आहे काय माहीत. आता हे अनंतचतुर्दशीचं विसर्जन झालं की देवीला वेठीला धरायची लगबग सुरु होईल. त्यामानाने रावण नशिबवान - निदान असे ९-१० दिवसांचे दशावतार तरी त्याच्या वाट्याला येत नाहीत. एकदाच काय ते दसऱ्याला जळतो :-)

No comments: