Thursday, September 15, 2016

व्हॉटसेप (हे देवनागरीत लिहिणं अशक्य दिसतंय!) वरच्या ग्रुप्सवर येणारे काही मेसेजेस इग्नोअर करायची आता सवय लागलेय. पण काही काही मेसेजेस खरंच डोक्यात जातात. असाच आरएसएस वरचा एक मेसेज एका ग्रूपवर आला. ग्रुपचा उद्देश आणि आरएसएस दोहोंचा बादरायणसुद्धा संबंध नाही. बरं, तो मी इग्नोअर केला असता. पण त्यात काही कारण नसताना 'मुलींनी तोकडे कपडे घातले की मुलं लैंगिक गुन्हे करायला प्रवृत्त होतात असं म्हटलं की तुमच्या नाकाला का मिरच्या झोंबतात' असलं शेंडा-बुडखा नसलेलं विधान काही कारण नसताना घातलं होतं. असला वैताग आला. मी सरळ विचारलं की मुलांना असं करावंसं वाटतं हासुध्दा मुलींचा गुन्हा का? चूक नजरेत असलेल्या पापाची आहे. ती नजर बदलावी असं काहीतरी करायला हवं, हो ना? पण ते काम कर्मकठीण. अगदी हर्क्युलिस आला तरी त्याच्या बापाच्याने होणार नाही. कारण ह्या देशात आम्ही स्त्रीत्वाची किती महती गायली, देवीचा किती उदोउदो केला तरी स्त्री ही पुरुषांच्या मते फक्त एक उपभोग्य वस्तू होती, आहे आणि राहिल. अगदी यावश्चंद्रदिवाकरौ म्हणतात तशी राहील. ह्यांना बदलायचं नाहीये. जे काही करायचं ते बायकांनी. आम्ही पृथ्वीतलावर जनमाला येऊन ह्यांच्यावर उपकार केलेत असा एकूणात भाव. सन्माननीय अपवाद असतीलही पण ते नियम सिध्द करण्यापुरतेच.

बरं, बायकांनी 'आमच्या कपड्यांवर निर्बंध का?' असं विचारायचा अवकाश की लगेच 'मग तुमचा आयटम सॉंग्जना पाठींबा दिसतोय' असं (बायकासुध्दा!) कुजकटपणे विचारतात. तिथे 'मागणी तसा पुरवठा' हा नियम लागू होतो हे सोयीस्करपणे विसरतात. तुम्ही असले चित्रपट बघायचं थांबवा, ते असली गाणी दाखवायचं थांबवतील. आहेत का असे राम ह्या देशात? नाही ना? मग बायकांनाच सीता व्हायची सक्ती का?

आणि हो, बायकांनी अंगभर कपडे घातले की हे असे गुन्हे व्हायचे थांबतील असं म्हणणं किंवा तशी अपेक्षा करणं म्हणजे शुद्ध शेखचिल्ली मूर्खपणा आहे. व्यवस्थित अंगभर कपडे घातलेल्या बाईकडे तरुण तर सोडाच पण 'सिनियर सिटीझन्स' म्हणून सरकारकडून फायदे उकळणारे म्हातारे सुध्दा डोळे फाडफाडून बघत असतात. त्यांचे डोळे बांधून मग त्यांना घराबाहेर काढा असं आम्ही बायकांनी म्हटलं तर?

पण एव्हढा विचार करेल कोण? आलं मनात, टाका एक पोस्ट. आयतं माध्यम मिळालं की सगळ्यांचे लेखकू होतात. मग बोलण्यात अर्थ असो वा नसो. (बाप रे! हे मलाही लागू आहे हे अचानक जाणवून गेलं!)

No comments: