Tuesday, August 16, 2016

इरोम शर्मिलाने उपोषण थांबवून राजकारणाच्या मार्गाने आपला लढा पुढे चालू ठेवायचा निर्णय जाहीर केल्याबरोबर तिचे सहकारी आणि कुटुंबीय सगळ्यांनी तिची साथ सोडल्याची बातमी वाचून आश्चर्य वाटलं नाही किंवा रागही नाही आला. एव्हढंच काय तर स्वत:च्या ह्या वागण्याचं आश्चर्यसुध्दा वाटलं नाही. पण आज लोकसत्तात एका पत्रात पुलं. च्या 'तुझे आहे तुजपाशी' मधल्या आचार्यांच्या तोंडचा एक संवाद वाचून जाणवलं की अरे, खरंच ही घटना काही वर्षं आधी घडली असती तर आपल्याला नक्की आश्चर्य वाटलं असतं की हे लोक असं कसं करू शकतात? त्यांच्या दुटप्पी, स्वार्थी वागण्याचा रागही आला असता. हे असं वाटण्यात बराचसा भाबडेपणा असता हे नक्की. थोडा आशावाद असता का?

आणि आज? लोकांचं स्वार्थी, मतलबी वागणं जणू गृहीत धरलंय. हे असंच असणार आहे हे एकदा ठरवून घेतलं की मग निदान आपल्यापुरत्या तरी गोष्टी सोप्या होतात. ज्या गोष्टी बदलायला आपण काही करू शकत नाही त्याबद्दल त्रागा करून काय फायदा असा सुज्ञ (!) विचार येतो. हे असं का आहे किंवा हे असं नसायला पाहिजे किंवा हे नसू शकण्याची सूक्ष्म का होईना शक्यता आहे असं वाटतच नाही. आपण पोक्त, परिपक्क, समजूतदार वगैरे होतो.

आज असं वाटतंय की थोडा भाबडेपणा गाठीला शिल्लक ठेवायला हवा होता. मग झाली असती थोडी चिडचिड तरी चाललं असतं. पण एखादी गोष्ट हरवते तेव्हाच तिचं महत्त्व कळतं आपल्याला.

No comments: