Saturday, July 30, 2016

कोडमंत्र

मी ह्या ब्लॉगवर अनेकदा म्हटल्याप्रमाणे लोकसत्तात परिक्षण वाचल्याशिवाय मी सहसा कुठलंही नाटक बघायला जात नाही. पण कोडमंत्र बद्दल बरंच वाचलं होतं. A Few Good Men  हे एरॉन सोर्कीन ह्या लेखकाचं गाजलेलं नाटक. ह्याचे ब्रॉडवेवर तर प्रयोग झालेच पण ह्यावर एक इंग्रजी सिनेमाही निघाला. इतरही अनेक भाषांत त्याचे प्रयोग झाले. आपल्या देशात निदान गुजराती रंगभूमीवर तरी 'कोडमंत्र' ह्याच नावाने ह्याचे प्रयोग झाल्याचं माझ्या वाचनात आहे. त्यामुळे नाटक चांगलंच असणार ह्याची खात्री होती. तसंही A Few Good Men हा सिनेमा मी कधी पूर्णपणे पाहिलेला नाहीच.

नाटकाच्या कथेला पार्श्वभूमी आहे ती अर्थातच भारतीय सेनेची. सुरुवात होते ती रवी शेलार नावाच्या मराठा रेजिमेंटमधल्या एका सैनिकाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्राने. त्याने लिहिलेलं असतं की तिथलं ट्रेनिंग खूप खडतर आहे आणि त्याच्या प्रकृतीला ते झेपत नसल्याने त्याने बदलीचा अर्ज केलाय. मग तिला पुढली बातमी मिळते ती त्याच्या मृत्यूची. तो मृत्यूही नैसर्गिक नाही तर खून. आणि तो खून केलेला असतो तो प्रत्यक्ष त्याच्या मोठ्या भावाने विक्रम शेलारने. ती हबकून जाते. आपल्या मोठ्या मुलाला वाचवण्यासाठी प्रख्यात मिलिटरी लॉयर अहिल्या देशमुखकडे जाते. घडलेल्या घटनेला साक्षीदार असल्याने तुमच्या मुलाला वाचवायला मी फारसं काही करू शकेन असं वाटत नाही हे अहिल्या तिला प्रांजळपणे सांगते. पण रवीच्या आईचं म्हणणं एकच - माझा मुलगा असं करू शकत नाही. तो निर्दोष आहे. त्यात सरकारतर्फे प्रसिध्द वकिल विश्वास राजेशिर्के काम पहाणार आहेत अस कळतं. त्यामुळे अहिल्याला कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय यायला लागतो. ती ही केस घ्यायचं ठरवते. आणि इथेच आपली ओळख होते ती 'कोडमंत्र' ची. काय असतो हा 'कोडमंत्र'? त्याचा आणि कुठल्याही प्रकारच्या सेनेचा काय संबंध? तो आवश्यक की जुलुमी? रवी शेलारच्या मृत्यूशी त्याचा काय संबंध?

कर्तव्यदक्षता आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यातली सीमारेषा फार धुसर असते हे नक्की. सैन्यात शिस्त ही असलीच पाहिजे हेही नक्की. पण म्हणून माणुसकी विसरली जाता कामा नये हे नाटक पाहिल्यावर अत्यंत प्रकर्षाने जाणवतं. आपल्याकडे सैन्य, सीमा, शत्रूदेश ह्या विषयावर अनेक चित्रपट निघालेत पण रंगभूमीवर फारशी नाटकं आली नाहीत. ४०-५० माणसांचा संच घेऊन प्रयोग करणं तितकं सोपंही नाही म्हणा. पण हे आव्हान ह्या टीमने लीलया पेललं आहे. अगदी सीमेवरच्या तळाच्या सेटपासून ते मधूनमधून कवायत करत जाणाऱ्या सैनिकांपर्यंत सगळं काही आपल्याला आपण नाटक पाहतोय ह्याचा विसर पाडतं. मुक्ता बर्वे आणि अजय पुरकर दोघांचाही अभिनय लाजवाब पण बाकीच्या सगळ्यांची सुध्दा त्यांना उत्तम साथ मिळालेय.

कर्नल निंबाळकरांचं एक मत मात्र मला अगदी पटलं - इस्त्रायलमध्ये जसं तरुणांना वयात आल्यावर लष्करी शिक्षण दिलं जातं तसं आपल्या देशातही करायला हवं. मी तर असंही म्हणेन स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता हा नियम सर्व तरुणांना लागू करण्यात यावा. त्यामुळे एक तर आपल्या सैनिकांना किती खडतर परिस्थितीत काम करावं लागतं ह्याची जाणीव राहील आणि दुसरं हे की देशात एकूणच जो 'चलता है' चा भोंगळ गलथान कारभार आहे तो दूर व्हायला मदत होईल.

देशभक्तीपर मेसेजेस फॉरवर्ड करण्याइतपतच देशभक्ती उरलेल्या आपल्या देशात प्रत्येकाने आवर्जून बघावं असंच हे नाटक आहे.

No comments: