Saturday, May 2, 2015

संभाजी - विश्वास पाटील

खरं तर ही कादंबरी मी बऱ्याच दिवसांपूर्वी लायब्ररीत पाहिली होती. पण ती उचलायचा धीर झाला नव्हता. शिवाजी महाराजांच्या ह्या पुत्राबद्दल इतिहासात फारसं वाचल्याचं स्मरत नाही पण का कोणास ठाऊक त्याच्याबद्दल माझं चांगलं मत नव्हतं. औरंगजेबाचा मुसलमान होण्याचा प्रस्ताव धुडकावून त्याऐवजी मरण पत्करण्याची घटना सोडली तर स्वराज्यासाठी त्याने काही केल्याचं माझ्या वाचनात नव्हतं. उलटपक्षी एक बाहेरख्याली, व्यसनी आणि स्त्रीलंपट राजा अशी त्याची प्रतिमा माझ्या मनात होती - का ते मलाही नाही सांगता येणार. त्यामुळे हे असलं कशाला वाचायचं असंच वाटलं. पण त्या दिवशी मला काय वाटलं कोणास ठाऊक मी ती दोन भागातली कादंबरी घरी न्यायची ठरवली.

सुरुवातीलाच लेखकाने इतिहासकारांच्या चुकीच्या चित्रणाने मराठी मनांत संभाजीराजांबद्दल वाईट मत बनलं असल्याचं सांगून टाकलंय. उपलब्ध कागदपत्रांची छाननी करून ते चुकीचं असल्याचं नमूद केलंय. त्यामुळे कादंबरी वाचायला धीर आला. पहिल्या भागात जिने एकेकाळी पोटाच्या मुलाप्रमाणे आपल्यावर माया केली त्याच सावत्र मातेच्या, सोयराबाईंच्या दुश्वासाचा बळी ठरलेले संभाजीराजे दिसले. शिवाजीमहाराजांना ज्यांनी साथ केली त्याच अष्टप्रधानातल्या अण्णाजी दत्तो सारख्यांनी स्वार्थापोटी आणि गैरसमजापोटी बाप-लेकात तेढ कशी वाढेल एव्हढंच पाहिल्याचं दिसलं. शून्यातून स्वराज्य निर्माण केलेल्या शिवाजीमहाराजांसारख्या माणसाने घरच्या राजकारणापुढे हात टेकल्याचं पाहून आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि रागही आला. वतनाच्या लोभाने आपल्याच मातीशी बेईमानी करणारी माणसं बघून शिसारी आली. हा भाउबंदकीचा शाप मराठी मातीला फार पूर्वीपासून आहे ह्याचं वैषम्य वाटलं. जनतेबाबत कळवळा असणारे, मुत्सद्दी आणि पराक्रमी संभाजीराजे पाहून आश्चर्यमिश्रित आनंद वाटला.

दुसरा भाग वाचायला सुरुवात केली तेव्हा संभाजीराजांबद्दलचं माझं मत बदलायला लागलं होतं. हा राजा इथे वर्णन केलाय तसा असला तर तो आणखी जगला असता तर मराठ्यांचा इतिहास कसा बदलला असता असं वाटून गेलं. आणि त्याचबरोबर कादंबरी पुढे वाचायची भीती वाटू लागली. औरंगजेबाच्या आणि त्याला सामील झालेल्या फितुरांच्या प्रत्येक पराभवानंतर आनंदी होणारया मला संभाजीराजांचे हालहाल करून त्यांना मारण्यात आलेलं वाचता येणारच नव्हतं हे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं. दक्षिण जिंकता न आल्याची खंत मनात घेऊनच हा जुलमी बादशहा शेवटी मेला हे समाधान पुरेसं नव्हतं. पण वाचायला घेतलेलं एखादं पुस्तक मध्येच अर्धवट सोडून द्यायचं हेही पटत नव्हतं.

शेवटी बराच विचार केला आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान संभाजीराजांना पकडून न्यायच्या मोहिमेवर निघतो हे वाचून मी पुस्तक बंद केलं.

इथे हेही नमूद करायला हवं की संभाजीराजांचं इतिहासात आजवर झालेलं चुकीचं चित्रण पुसून टाकण्याच्या अट्टाहासाने त्यांच्यात नसलेले गुण तर लेखकाने चिकटवलेले नाहीत ना अशी शंका पुस्तकभर येत राहिली. तसंच अनेक कादंबऱ्यातून (मराठी असो वा इंग्रजी) नायक-नायिका नेहमी सुस्वरूपच दाखवल्या जातात तसं काहीसं इथेही झालंय की काय असंही वाटून गेलं. आजवर पुस्तकांतून्, संग्रहालयातून किंवा टीव्हीवर पाहिलेल्या कार्यक्रमातून भारतातल्या राजे-रजवाड्यांची, त्यांच्या कुटुंबियांची जी चित्रं पाहिली आहेत त्यात काही अपवाद वगळता फारसं कोणी देखणं वा सुन्दर आढळून आलेलं नाही. भाराभर घातलेले दागिने आणि मुकुट वगैरे राजचिन्ह वगळली तर चार-चौघांसारखाच तोंडावळा आढळलाय. मग उगाच धारदार नाक, गौर रंग, सडपातळ बांधा वगैरे वर्णनाची काय गरज?

असो.  'संभाजी' वाचल्यावर माझं मत बरंचसं बदललं असलं तरी माझा स्वभाव तसा शंकेखोर असल्याने ह्या कादंबरीच्या पूर्वतयारीसाठी लेखकाने जे पुरावे तपासले ते कधीकाळी स्वत: पहायला मिळाले तरच ते १००% बदलेल. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी मोगली सत्तेशी कसा लढा दिला ह्यावर एखादी कादंबरी असली तर नक्की वाचेन.

No comments: