Monday, November 17, 2014

४. प्रहार, दिवाळी अंक २०१४

'शोधा म्हणजे सापडेल' ह्या न्यायाने २-३ बुकस्टोलवाल्यांनी नन्नाचा पाढा वाचूनही मी नेटाने आणखी एकाजवळ चौकशी केली तेव्हा 'प्रहार' चा अंक हाती लागला. एव्हढंच नव्हे तर २ दिवसांनी त्याने दीपोत्सव आणि आकंठ सुध्दा आणून दिले. अक्षरगंध मात्र मुंबईत आता कुठे मिळणार नाही असं म्हणाला. पुढल्या महिन्यात लायब्ररी पुन्हा सुरु करणार आहे. तिथे कदाचित मिळेल.

तर आता प्रहारबद्दल. लोकसत्तात आलेल्या परीक्षणानुसार महाराष्ट्रात भरणाऱ्या विविध बाजारांबद्दल ह्या अंकात माहिती आहे एव्हढंच माहीत होतं. त्या दृष्टीने अंकाने अजिबात निराशा केली नाही. अलिबाग आणि वसईचा मासळीबाजार, मुंबईचा चोरबाजार, महाराष्ट्रात ७-८ ठिकाणी भरणारे घोडेबाजार, उत्तर कोकणातल्या प्राचीन बाजारपेठा, देवगड, कणकवली, कुडाळ, साळगाव, माणगाव, वालावल, चिपळूण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, गोवा, मिठबाव ह्या ठिकाणच्या पेठा, सावंतवाडीचा लाकडी खेळण्याचा बाजार, शिरोड्याचा मीठाचा बाजार आणि भेडशीचा वनौषधींचा बाजार - ह्या सगळ्यांबद्दल इतरत्र कुठे वाचायलासुध्दा मिळालं नसतं.

चोरबाजारावरचा लेख वाचून मला सुध्दा तो एकदा जाऊन बघायची इच्छा झाली आहे :-) प्राचीन काळाच्या बाजारावरच्या लेखात वजनांची एक मोठी जंत्रीच दिली होती - १ चिळव म्हणजे ५ ग्रेम, २ चिळव म्हणजे एक मिळव, दोन मिळव म्हणजे एक १ कोळव, दोन कोळव म्हणजे एक चिपट, दोन चिपट म्हणजे एक आठवा, दोन आठवे म्हणजे एक शेर, चार शेर म्हणजे एक पायली, १६ पायली म्हणजे एक मण, वीस मण म्हणजे एक खंडी, १२० शेर म्हणजे १ फरी. बाप रे! वाचता वाचताच मला दम लागला. लोकांना त्या काळी कसं लक्षात राहत असेल हे सगळं काय माहीत.

१-२ गोष्टी मात्र खटकल्या. अंकात बऱ्याच ठिकाणी शुध्दलेखनाच्या चुका आहेत. शेवटचा भेडशीच्या वनौषधींच्या बाजारावरचा लेख अपूर्ण वाटला. आणि बऱ्याच लेखांत सध्याच्या काळातल्या बाजारात दुकानं असलेल्या लोकांच्या नावांचा उल्लेख Product Placement आहे की काय असं वाटण्याइतपत अस्थानी होता.

ह्या त्रुटी मान्य करूनही एका वेगळ्या विषयावरचे लेख वाचल्याचं समाधान अंकाने दिलं.

No comments: