Wednesday, November 6, 2013

लोकसत्ता दिवाळी अंक २०१३

मराठी माणूस म्हटला की अभ्यंगस्नान, उटण, रांगोळी, फराळ आणि फटाके ह्यांच्यासोबत दिवाळी अंक हा आलाच. मग मी तरी अपवाद कसा असणार? :-) लोकसत्ताचा दिवाळी अंक इंटरेस्टिंग वाटला म्हणून आणला. अंकाने निराशा केली नाही हे विशेष.

अंकाची सुरूवात झाली आहे ती मिर्झा गालिब वर गुलजारने लिहिलेल्या चरित्राच्या मराठी अनुवादातल्या दोन प्रकरणानी. हा अनुवाद अंबरीश मिश्र ह्यांनी केला आहे. ही दोन प्रकरणं वाचून गुलजारने लिहीलेलं चरित्र कसं असेल ह्याची कल्पना येते. मूळ पुस्तक "वाचायची पुस्तकं' नावाच्या मारूतीच्या शेपटीपेक्षाही अधिक वेगाने वाढत चाललेल्या यादीत समाविष्ट केलं आहे. :-)

कवितांचा आणि माझा अगदी ३६ चा आकडा नसला तरी फार सख्यही नाही. त्यामुळे किशोर सौमित्र ह्यांच्या कवितांची मला फारशी ओळख नाही. सिनेमा आणि नाटक ह्यातून काम केलेले कलाकार म्हणून ते मला माहीत आहेत. त्यामुळे त्यांचा 'लोन्ली' हा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचायला घेतला आणि आतून हलायला झालं. गर्दीत राहूनही एकटेपणाचा अनुभव बहुतांशी लोकांना नवा नव्हे पण स्वत:च्या आयुष्यातल्या अनेक घटनांतून त्याचेही अनेक पैलू लेखकाने छान उलगडून दाखवलेत. 'झुलवा' हा चित्रपट मी कधी पाहिला नाही. आणि कधी पाहणार ही नाही. ह्या बाबतीत मी अगदी पळपुटी आहे. जगात खूप दू:ख आहे, अगतिकता आहे, वेदना आहेत - सगळं माहीत आहे. मी काही काचेच्या राजवाड्यात वाढवला गेलेला राजपुत्र सिध्दार्थ नाही. मग उगाच त्यांची वर्णनं असलेली पुस्तकं कां वाचायची? चित्रपट का पहायचे? डोक्याला ताप देणार्या अनेक गोष्टी असताना हा नवीन भुंगा का लावून घ्यायचा? 'हे असं काही होत नाही' असं म्हणून जे सोडून देता येत नाही ते आपल्या आयुष्यात का आणायचं? अर्थात ह्याबाबत मी मित्रमंडळीच्या अनेक शिव्या खाल्ल्या आहेत. पण माझी भूमिका कायम आहे. 'जोगवा' तर मोजून दहा मिनिटं मी पाहिला आणि मग चेनेल बदललं तरी खूप अस्वस्थ वाटत राहिलं - ताप यायच्या आधी वाटतं तसं. लेखकाने ह्या चित्रपटात भूमिका करताना आलेला अनुभव लेखाच्या शेवटी मांडलाय. तो वाचावा असाच आहे.

ह्यापुढचे लेख कधीकाळी भारतात असलेल्या राजेरजवाड्यांच्या आत्ताच्या वंशजाबद्दलचे आहेत. ह्यात पुण्याचे पेशवे, जव्हारचे मुकणे घराणे, अहेरीचे आत्राम घराणे, सावंतवाडीचे सावंत-भोसले घराणे, कोल्हापूरचे राजघराणे आणि सांगलीचे पटवर्धन ह्यांच्याविषयीचे लेख आहेत. सावंत-भोसलेवरचा लेख थोडा रटाळ वाटला.

जमशेटजी टाटा हे नाव ऐकलं की शालेय जीवनातलं इतिहासाचं पुस्तक आठवतं. पण गिरीश कुबेर ह्यांचा लेख त्या पुस्तकापेक्षा जास्त माहिती देणारा आहे. म्हैसूर-बंगलोर मध्ये रेशीम उद्योग भरभराटीला येण्यामागे जमशेटजी टाटा आहेत हे मला आत्ता कळलं. तीच गोष्ट गोरेगाव-जोगेश्वरीमध्ये असलेल्या गोठ्याबद्दल. भारतात पोलाद कारखाना काढायला ह्या माणसाने किती परिश्रम घेतले आणि भिलाई आणि मयूरभंजला त्यानी कसं संशोधन केलं ह्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. हा लेख म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिध्द होणार्या टाटा उद्योगसमूहाबद्दलच्या पुस्तकातलं एक प्रकरण आहे. अर्थात हे पुस्तक वाचायला हवंच.

माझ्या 1000 Things To Do Before You Die च्या यादीत बंगाली शिकणं ही एक एन्ट्री आहे ती ह्या भाषेतलं साहित्य मुळातून वाचता यावं म्हणून. भाषांतर हा प्रकार मला फारसा कधीच रुचला नाही. अर्थात दाक्षिणात्य भाषा शिकता येतील असं वाटत नाही त्यामुळे त्यातलं साहित्य अनुवादित स्वरुपात वाचायला लागणार हे आलंच. तर 'नमनाला घडाभर तेल' घालायचं कारण म्हणजे 'गीतांजली आणि नोबेल' हा लेख. गीतांजलीला नोबेल मिळाल्यावर भारतात आणि जगभरात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याचा आढावा डॉ. शरद देशपान्डे ह्यांनी ह्या लेखात घेतला आहे. 'गीतांजलीतले रविंद्रनाथ' हा रजनीकांत सोनार ह्यांचा लेखही वाचनीय आहे. थोडक्यात काय तर बंगाली शिकायला हवं ह्या माझ्या एन्ट्रीची पुन्हा आठवण ह्या निमित्ताने झाली. योग कधी येतो ते देवालाच ठाऊक.

पुस्तकं वाचणं हा माझा अत्यंत आवडता छंद असला तरी प्रकाशक कोण हे कधी आवर्जून पाहिल्याचं आठवत नाही. खरं तर पुस्तक वाचकापर्यंत आणण्यात त्याचा मोलाचा सहभाग असतो. 'राजहंसी वाटचाल' हा राजहंस प्रकाशनावर आधारित लेख त्याचे संचालक दिलीप माजगावकर ह्यांनी लिहिला आहे तो ह्या दृष्टीने छान माहिती देणारा आहे. व्यंगचित्रांकित साहित्यसंभार (शकुंतला फडणीस), सृजनशील मुखपृष्ठे (वसंत सरवटे), 'रंगायनचे दिवस' (अरुण काकडे) आणि 'सत्यजित राय आणि प्रेमचंद' (विजय पाडळकर) असे सगळे लेख वाचकांच्या माहितीत मोलाची भर घालणारे आहेत ह्यात वाद नाही. प्रशांत कुलकर्णीचं 'ब्रेकिंग न्यूज' मस्तच. त्यामानाने 'काय बरे होणार ह्या निवडणुकीत' सपक वाटला.

ज्याला इंग्रजीत 'Running from pillar to post' म्हणतात तशी धावाधाव करून 'धनंजय' आणि 'चैत्राली' हे दोन अंक आजच मिळवलेत. पाहू धावाधाव किती सार्थकी लागली आहे ते :-)

No comments: