Tuesday, September 3, 2013

ह्या वर्षी जन्माष्टमीचा मुहूर्त साधून पुन्हा एकदा Bhagawad Gita As It Is वाचायला घेतलं आहे. मागच्या वेळी काही अध्यायांनंतर पुढे वाचायला जमलंच नाही. ह्या वेळी मात्र वाचून पूर्ण करायचंच असं ठरवलंय. मग भले रोज दोन पानंच वाचून झाली तरी चालेल.

अजूनपर्यंत फक्त Introduction वाचून झालंय. तरी २-३ प्रश्न पडलेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की माझी भक्ती करायला सगळी कामं सोडून द्यायची गरज नाही. ती करता करता भक्ती कर. आता हे कसं जमायचं? म्हणजे एखादा सर्जन आहे तो ऑपरेशन करता करता 'हरे राम हरे कृष्ण' असं कसं म्हणू शकेल? मी एक प्रोजेक्ट मेनेजर आहे. तर क्लायंटशी बोलताना किंवा माझ्या टीमसोबत मिटींग करताना कृष्णाचं नाव घेणं कसं शक्य आहे? आता दुसरा प्रश्न असा की संत तुकाराम व्यवसायाने वाणी होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण दुकान चालवता चालवता ते भजनात रमून जायचे आणि त्यापायी दुकान शेवटी बुडालं. ह्याचा अर्थ भक्ती आणि दररोजच्या जगण्यातला व्यवहार ह्याची सांगड घालता येणं कठिण आहे असा घ्यायचा का? एके ठिकाणी कृष्णाने असंही म्हटलंय की जो भक्तीभावाने गीताश्रवण करेल त्याची सारी पापं धुतली जातील. समाजात असेही लोक असतील जे आयुष्यात वाईट कामं करत असतील, दुसर्याला फसवत असतील, पण तरीही हे जे सत्संग होतात तिथे जाऊन भक्तीभावाने गीतेवर प्रवचन ऐकत असतील. जे ऐकतात ते तिथेच बुवांच्या पायाशी सोडून पुन्हा अनैतिक गोष्टी करायला मोकळे होत असतील. गंगेत डुबकी मारून पापं धुतली जातात म्हणून 'सौ सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको' ह्या न्यायाने तीर्थक्षेत्री जाणारे नमुने काही कमी नाहीत. अश्या लोकांची पापंसुध्दा गीताश्रवणाने धुतली जात असतील तर 'ये सरासर ज्यादती है मिलोर्ड' :-)

असो. आगे आगे देखते है होता है क्या :-)

No comments: