Thursday, August 29, 2013

नांदी - भूतकाळाची सफर

१० नाटकातले नाट्यप्रवेश एकाच नाटकात? हे म्हणजे 'Buy one get २ free' सारखं काहीतरी वाटतं, नाही का? पण मी हे नाटक पहायचं ठरवलं ते दोन कारणांसाठी. एक तर हे की ह्यातील काही नाटकं - उदा. नटसम्राट - पुन्हा कधी रंगभूमीवर येतील माहीत नाही. निदान एक प्रवेश तरी पदरात पाडून घ्यावा. आणि दुसरं हे की काही नाटकं - उदा. एकच प्याला, बेरीस्टर किंवा सखाराम बाइंडर - मला झेपतील की नाही ही शंका.

धावपळ करकरून शिवाजी मंदिरला पोचले पण नाटक तब्बल २० मिनिटं उशिराने सुरु झालं. प्रयोग सुरु झाल्यावर ह्याबद्दल साधी दिलगिरी व्यक्त झाली नाही हे खटकलंच. रविवार असला तरी प्रेक्षकांचे आणखी काही बेत असू शकतात आणि उशिराने सुरु झालेल्या नाटकाने ते फिसकटू शकतात हे कोणाच्याही गावी नव्हतं.

असो. तर आता नाटकाबद्दल. नाटय़शास्त्रकार भरतमुनी पृथ्वीवर प्रकट झाले असल्याने कुठल्याश्या टीव्ही चॅनेलवरच्या "अकल्पित कल्पिताना" नावाच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्यांची मुलाखत असते अशी नाटकाची सुरुवात. सूत्रसंचालिकेने खोदून खोदून विचारल्यावर भरतमुनी आपल्या येण्याचं प्रयोजन सांगतात. आजवर झालेल्या तमाम नाटकांच्या प्रयोगांचं आणि त्यान्च्याशी संबंधित वस्तूंचं एक संग्रहालय बनवायची योजना सरकारदरबारी सादर करणं हे ते प्रयोजन. "स्त्री-पुरुष संबंध" हा सनातन विषय आत्तापर्यंतच्या नाटकांत कसा हाताळला गेला आहे ह्या सूत्रसंचालिकेच्या प्रश्नावर भरतमुनी आपल्या Laptop वर तिला काही नाटकांचे नमुने दाखवतात.

‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या कालिदासाच्या नाटकातली दुष्यन्त-शकुंतला यांची दरबारातली भेट हा पहिला प्रवेश. गर्भवती शकुंतलेच्या बोटातली खुणेची अंगठी हरवल्यामुळे राजा दुष्यन्त तिचा स्वीकार करायला नकार देतो. पितृत्त्व नाकारण्याच्या आजकालच्या सिरीयल्समधल्या प्रसंगांना ही अशी परंपरा आहे तर. राजा दुष्यन्त झाले होते अविनाश नारकर आणि शकुंतला म्हणजे अश्विनी एकबोटे. अविनाश नारकरांचा अभिनय मला नेहमीच एकसुरी वाटत आलेला आहे. 'मला सासू हवी' मधल्या मीराचे वडील राजा दुष्यन्ताचे कपडे घालून आलेत की काय अशी शंका वाटावी एव्हढा तोचतोचपणा. अश्विनी एकबोटेने अभिनय चांगला केला असला तरी शकुंतला आणि राजा दुष्यन्त ह्या पात्रांच्या वयाच्या मानाने ही जोडी विसंगत वाटत होती हे नक्की.

मला शास्त्रीय संगीताचा कान नाही आणि जे समजत नाही त्याच्यात रस कसा वाटावा? त्यामुळे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत सौभद्र’ मधला रुक्मिणी-श्रीकृष्ण प्रवेश सुरु झाला तेव्हा आता हे कधी गायला सुरुवात करतात ह्या कल्पनेने धडकी भरली होती. :-) श्रीकृष्ण झालेल्या अजय पूरकरांनी ‘प्रिये पहा' सारखी पदं सादर केली. पण मला त्याबद्दल काहीच ज्ञान नसल्याने त्याबद्दल काहीच लिहू शकत नाही. प्रसाद ओकने मात्र लटकं रागावणारी, लाजणारी रुक्मिणी झक्कास उभी केली होती.

कृ. प्र. खाडिलकरांच्या ‘कीचकवध’ मध्ये द्रौपदीला रात्री नाट्यशाळेत बोलावणारया कीचकाला चांगला धडा शिकवायला हवा असं म्हणणारा भीम म्हणजे इंग्रजी सत्ता बंड करून उलथवली पाहिजे ह्या मताचे जहाल क्रांतीकारक, थोडा अपमान झाला तरी भविष्यावर नजर ठेवून तो सोसला पाहिजे असं म्हणणारा युधिष्ठिर म्हणजे मवाळवादी आणि ह्या दोघांच्या कात्रीत सापडलेली द्रौपदी म्हणजे भारतमाता असा रुपकाचा खेळ होता. म्हणून ह्या नाटकावर तेव्हा बंदी घातली गेली होती असं भरतमुनी सूत्रसंचालिकेला म्हणजे पर्यायाने प्रेक्षकांना सांगतात. ह्यात भीमाची भूमिका करणारे पूरकर आणि द्रौपदी झालेली तेजस्विनी पंडित आपापल्या भूमिकांत चपखल बसले होते. पण युधिष्ठिर झालेले चिन्मय मांडलेकर मात्र 'तू तिथे मी' च्या सेटवरून आल्यासारखे वाटत होते. चेहेर्यावरचे भाव थेट 'सत्यजित मुधोळकरां'चेच.

राम गणेश गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’मधली सिंधू तर मला जन्मात कधी समजेल असं वाटत नाही. त्यापेक्षा दारू पिऊन घरी येणार्या नवर्याला झोडपून काढला पाहिजे असं म्हणणारी तिची मैत्रीण गीता अधिक भावली. सीमा देशमुख सिंधू म्हणून तर स्पृहा जोशी गीता म्हणून मस्त शोभल्या.

शाकुंतल काय किंवा कीचकवध किंवा सौभद्र काय, ढोबळमानाने ह्या सगळ्याच कथा भारतीय प्रेक्षकांना परिचयाच्या. एकच प्याला चा उल्लेख निदान मराठी प्रेक्षकांना तरी नवीन नाही. पण वसंत कानेटकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ च्या कथेबद्दल निदान मला तरी फार माहिती नाही. प्रोफेसर विद्यानंद आणि त्यांच्या बायकोतल्या प्रवेशाची पूर्वपीठिका नसल्याने भरतमुनींनी पार्श्वभूमी थोडक्यात समजावून देऊनही पहिले काही क्षण एखादी कथा मधूनच ऐकावी तसं वाटलं. गुन्हेगारीकडे वळलेला नवरा परत येणार नाही हे ठाऊक असतानाही त्याला नेण्यासाठी मनधरणी करणारी सुशिक्षित पत्नी पटली नाही तरी अश्विनी एकबोटेचा अभिनय जिवंत वाटला. अविनाश नारकरांबद्दल पुन्हा काही लिहीत नाही.

मला सगळ्यात आवडलेला प्रवेश म्हणजे वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांची पत्नी कावेरी ह्या दोघातला. पती-पत्नीचं नातं कसं असावं ह्यावर काही शब्दबंबाळ भाष्य न करताही खूप काही सांगणारा. आप्पासाहेबांचं कावेरीला 'सरकार' म्हणणं तर केवळ लाजवाब. शरद पोंक्षे आणि सीमा देशमुख ह्या दोघांनीही अतिशय सुरेख अभिनय केलाय. वन्समोअर द्यावासा वाटला अगदी. Hats off to you guys!

विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’ बद्दल खूप काही वाचलंय. जे वाचलं त्यावरून एकुणात हे नाटक आपल्याला झेपणारं नाही हे ठाऊक असल्यानेच बहुतेक त्यातल्या प्रवेशाबद्दल खूप उत्सुकता होती. सखाराम सोबत रहात असलेली चंपा आणि पुन्हा त्याच्याकडे आश्रय मागायला आलेली लक्ष्मी ह्यांच्यातला हा संवाद मी अक्षरशः अवाक होऊन ऐकला. लक्ष्मीला घरात परत घेताना 'तू पण जग आणि तुझ्यासोबत मी पण जगेन' असं जेव्हा चंपा म्हणते तेव्हा पोटात तुटलं. :-( सीमा देशमुख (लक्ष्मी) आणि तेजस्विनी पंडित (चंपा) केवळ अप्रतिम!

जयवंत दळवींचं ‘बॅरिस्टर’ हेही आपल्याला झेपणार नाही हे मला माहीत आहे. कथा थोडीफार ठाऊक आहे. बॅरिस्टर त्यांच्याकडे आश्रित असलेल्या विधवा राधावर प्रेम करतात. त्यांना तिच्याशी लग्न करायचं आहे आणि ते तिला तसं बोलूनही दाखवतात. पण ते करायची धमक त्यांच्यात नाही. त्यांचं तिला भविष्याबद्दलची स्वप्नं दाखवणं, त्यावर राधाने हातात भरलेल्या बांगड्या आणि डोक्यावरचे वाढवलेले केस दाखवणं आणि शेवटी कळवळून 'तुम्ही सांगताय त्याच्यावर मी विश्वास ठेवायचा ना?' असं त्यांना विचारणं अगदी आतपर्यंत सुन्न करून गेलं.

ह्या नाटकातले अजिबात न पटलेले दोन प्रवेश म्हणजे चं. प्र. देशपांडे यांच्या ‘बुद्धिबळ आणि झब्बू’ चा आणि प्रशांत दळवीच्या ‘चाहूल’ मधला मकरंद आणि माधवी ह्या जोडप्यातला. ‘बुद्धिबळ आणि झब्बू’ मधल्या नवविवाहिता मैत्रिणीला भेटायला आलेल्या मित्राचा (??) लघळपणा आणि तो सहनच नाही तर एन्जॉयही करणारी मैत्रीण दोन्ही पटले नाहीत. बॉसने आपल्या पत्नीसोबत एक रात्र घालवायची मागणी केली आहे हे ऐकूनही त्याला न खडसावता तिला येऊन सांगून तिच्या निर्णयाची वाट पहाणारा मकरंद आणि त्याबद्दल त्याच्यावर भडकून नकार देणारी आणि तरीही 'मला माझ्या करियरसाठी असं करायची वेळ आली तर तो माझा निर्णय असेल, दुसर्या कोणाचा नाही' असं म्हणणारी माधवी हे प्रत्यक्षात नसतीलच असं निदान आजकालच्या जगात तरी कोणी म्हणू धजणार नाही. पण म्हणून ते पटवून घेणं निदान मला तरी जमणार नाही.

असो. एक लिहायचं राहिलं. हृषिकेश जोशीनी भरतमुनींची तळमळ, सूत्रसंचालिकेच्या आणि फोन करून संवाद साधणार्या प्रेक्षकांच्या मूर्खपणामुळे होणारा त्रागा आणि चपखल शेरेबाजी करायचं टायमिंग अचूक साधलंय. तरी भरतमुनींना दरवेळी प्रश्न विचारताना '"स्त्री-पुरुष संबंध" "स्त्री-पुरुष संबंध" असा सूत्रसंचालिकेने केलेला उल्लेख खटकतो.

एकूण प्रयोग पाहता माझी रविवारची सकाळ सार्थकी लागली असंच मी म्हणेन.

No comments: