Tuesday, May 1, 2012

युध्दनेतृत्व - दि.वि. गोखले

चर्चिल, रूझवेल्ट, स्टेलीन आणि हिटलर - शाळेतल्या चार भिंतीत इतिहासाच्या तासाला आणि मग परीक्षेतल्या पेपरात भेटलेली माणसं. हिस्टरी चेनेलवरचे कार्यक्रम सोडले तर कधी काळी आयुष्यात पुन्हा भेटतील असं वाटलंही नव्हतं. पण नेहमीच्या क्राईमवरच्या पुस्तकांमधून थोडा बदल हवा म्हणून सहज लायब्ररीत पहिल्या किंवा दुसर्या महायुध्दावरचं एखादं पुस्तकं मागितलं आणि हे पुस्तक हाती आलं. रूढार्थाने शिक्षण होऊन इतकी वर्षं झाल्याने युद्धांचे तपशील, तेही परीक्षेत पैकीच्या पैकी मार्कस मिळवायचे ह्या एकाच उद्देशाने घोकलेले, खुपच पुसट झाले होते. ओस्ट्रेयाच्या राजपुत्राचा खून, व्हर्सायचा तह, पोलंडवर हल्ला, पर्ल हार्बर, हिरोशिमा आणि नागासाकी, नाझी छळछावण्या, लेनिनग्राडचा लढा असं ढोबळमानाने आठवलं तरी पण अगदी खरं सांगायचं तर अजूनही दोन्ही युध्दाच्या तपशिलाबद्दल माझा बराचसा घोळ होतो. त्यातून आपल्या इथलं इतिहासाचं शिक्षण म्हणजे नुसता मजकूर आणि सनावळ्या ह्यांवर भर. त्यापुढे जाऊन ह्या जागतिक युध्दातल्या प्रमुख नेत्यांचा नेते म्हणून आणि माणूस म्हणून कधी विचार करावासाच वाटला नाही. तो ह्या पुस्तकाने करायला लावला. नुसतं काय घडलं आणि कसं घडलं हे सांगण्यापेक्षा ते का घडलं असावं हे मांडून त्या अनुषंगाने इंग्लंड, अमेरिका, रशिया आणि जर्मनी ह्या देशांच्या प्रमुखांची ओळख हे पुस्तक करून देतं. त्यातही चर्चिल आणि रूझवेल्ट ह्यांचा उदोउदो आणि स्टेलीन आणि हिटलर ह्यांचा उध्दार असला प्रकार नाही. माणूस म्हटलं की तो चुका करणारच हे जाणून ह्या चारही नेत्यांनी काय बरोबर केलं आणि ते कुठे चुकले ह्याचं सुरेख विश्लेषण ह्या पुस्तकात आहे.

इतिहासावरची पुस्तकं, आणि तीही मराठी, वाचायची अजिबात सवय नसल्याने पहिली काही पाने वाचताना कंटाळा आला खरा पण नंतर तो कुठल्या कुठे पळून गेला. थोडक्यात काय तर वाचकाला पुस्तक वाचून संपल्यावरही त्याबद्दल विचार करायला लावेल ते खरं चांगलं पुस्तक ह्या कसोटीवर हे पुस्तकं पुरेपूर उतरतं.

No comments: