Friday, March 9, 2012

पर्व - डॉ. एस. एल. भैरप्पा

मराठी पुस्तकच घ्यायचं असं ठरवून मी लायब्ररीत गेले नव्हते. पण का कोणास ठाऊक इंग्लिश पुस्तकांच्या शेल्फ्सवरून नजर नुसती फिरत राहिली. एकही पुस्तक मनात रजिस्टर होईना. पुढल्या वेळी जाईन तेव्हा त्यातलं एखादं पुस्तक आणेन ह्यात शंका नाही. पण त्या दिवशी मात्र एकही घ्यावंसं वाटेना. आपण कधी कुठे कुठलं पुस्तकं वाचावं हेसुध्दा नशिबच ठरवत असावं बहुतेक. कारण कशी कोण जाणे, कधीही अनुवादित पुस्तकांच्या शेल्फाजवळ न फिरकणारी मी तिथे जाऊन पोचले. ह्यातली बहुतेक पुस्तकं मूळ इंग्रजी पुस्तकाची भाषांतरं आहेत. आता जी भाषा आपल्याला नीट वाचता येते, समजते त्यातली पुस्तकं मूळ रूपातच वाचायला हवीत हा माझा आग्रह. म्हणून नुसतीच पहात होते.

तेव्हढ्यात एका पुस्तकाकडे लक्ष गेलं - नाव होतं पर्व. मुखपृष्ठावर राजमुकुट घातलेल्या एका वृध्दाचं, रथ पळवणाऱ्या सारथ्याचं आणि आत बसलेल्या योध्याचं तसंच राजकन्या वाटावी अश्या दिसणार्या स्त्रीचं अशी तीन चित्र. हे पुस्तक अनुवादित भागात कसं असं म्हणत मी हातात घेतलं तेव्हा मूळ लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा आणि भावानुवाद सौ. उमा कुलकर्णी असे शब्द दिसले. डॉ. भैरप्पा हे कानडीतले नामांकित लेखक आहेत हे मी वाचलं होतं. कशावर असेल हे पुस्तक म्हणून मी उत्सुकतेने चाळायला घेतलं तर शल्य, कुंती, विदुर ह्यांचे उल्लेख आढळले. महाभारत! हा नेहमीच माझा कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. एखाद दोन परिच्छेद वाचले तर पुस्तकं वेगळंच वाटलं. मला कानडी भाषा येत नाही आणि शिकायचा बेतही नाहीये. मग म्हटलं हा अनुवादच वाचावा. पुस्तक चेकआऊट करायला गेले तर लायब्ररीची अटेंडंट म्हणाली की हा पुस्तकाचा दुसरा भाग आहे. अरे, खरंचं की, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. तिने सांगितल्यावर मुखपृष्ठावर लिहिलेली 'भाग २' ही अक्षरं दिसली. मग तिनेच पहिला भाग शोधून काढला आणि म्हणाली दोन्ही एकदमच घेऊन जा. अरे वा! आंधळा मागतो एक् डोळा आणि देव देतो दोन तश्यातली गत झाली.

रात्री उत्सुकतेने पहिला भाग वाचायला घेतला. हे पुस्तक आपण कसं लिहिलं ह्यावरच्या लेखकाच्या मनोगतात भीष्मांचं वय कुरुक्षेत्रावरच्या लढाईच्या वेळी जवळजवळ १२० होतं हे वाचून मी थक्क झाले. हा विचार मी कधी केलाच नव्हता. तीच गोष्ट गढवालच्या काही खेड्यातून आजही प्रचलित असलेल्या बहुपतीत्त्वाच्या प्रथेबाबत. भारतात पूर्वीही कधी ही प्रथा असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. द्रौपदी पाच पांडवांची बायको झाली ते अपघाताने अशीच माझी समजूत होती. आजही काही खेड्यात असं चालतं ही माहिती बहुपत्नीत्त्वदेखील पचनी न पडलेल्या २१ व्या शतकातल्या मला धक्कादायक आहे.

मग पुढे असे धक्के बसतच गेले - ऐशीच्या जवळपास पोचलेला माद्रीचा भाऊ शल्य, शहाऐशी वर्षांची कुंती, किंमत मोजून मुलीचं लग्न करून देणारे गांधार, मद्र ह्यांच्यासारखे देश, ज्याला देवलोक म्हणतात त्यातल्या दुराचारच वाटू शकतील अश्या प्रथा. पांडुराजा स्वत:च्या मुलांचा पिता का होऊ शकला नाही, कर्णाचा आणि पाच पांडवांचा जन्म कसा झाला, द्रौपदी पाच पांडवांची बायको कशी झाली ह्याबद्दल असं काही विलक्षण वाचायला मिळतं की आपण आत्तापर्यंत वाचले होतं किंवा पाहिलं होतं ते महाभारत कुठलं असं वाटावं.एकुणात महाभारतात स्त्री व्यक्तिरेखांची शोकांतिकाच आहे. पण हे पुस्तक वाचताना मला कुंती आणि द्रौपदीचं दु:ख नव्याने कळलं. एक स्त्री म्हणून त्यांनी जे सहन केलं ते कोणाही बाईच्या वाट्याला येऊ नये असंच.

महाभारताची कुठली कथा बरोबर ह्या वादात मला पडायचं नाहीये. पण हे पुस्तक जसंजसं वाचतेय तशीतशी माझी उत्सुकताही वाढते आहे. रामायणापेक्षा महाभारत मला नेहमीच अधिक भावलंय कारण तुमच्याआमच्यासारखी चुका करणारी माणसं ह्यात दिसतात. त्यांच्यात देवत्त्वाचा अंश असूनही. पण ही कादंबरी वाचताना त्यांच्यातलं माणूसपण अधिकाधिक अधोरेखीत् होतंय. सगळचं पटत नाहीये. काही गोष्टी तर धक्कादायक वाटताहेत. तसंही कृष्ण आणि थोड्याफार प्रमाणात कर्ण सोडला तर बाकी कुठलीच व्यक्तिरेखा माझी लाडकी नाही. त्यामुळे त्या व्यक्तिरेखांतले दोष प्रकर्षाने समोर आले तरी फारसं बिघडणार नाहीये. फक्त माझ्या मनातल्या कृष्णप्रतिमेला धक्का पोचेल असं काही वाचायला लागू नये असंच वाटतंय. कारण असं काही वाचूनही माझी भक्ती अभंग राहिल असा विश्वास असला तरी खात्री अजून नाहीये. :-(

पण ह्या निमित्त्ताने शतकानुशतकं लोकांच्या मनावर गारुड टाकणार्या ह्या महाकाव्याच्या अनेक बाजू मला दिसताहेत हेच किती समाधान आहे.

No comments: