Friday, April 29, 2011

किती दिवसांपासून लिहायचं म्हणत होते पण ह्या साईटवर मराठीतून लिहायला प्रचंड कष्ट करावे लागतात. Baraha मध्ये टायपून लिहायचा कंटाळा यायचा. पण आज विचार केला की लिहायचंच. काही दिवसांपूर्वी हर्बेरियमचं "हमिदाबाईची कोठी" पाहिलं. समिक्षक म्हणतात त्याप्रमाणे आताच्या काळात कोठी संस्कृती पाहून फ़ारसा धक्का वगैरे बसला नाही. पण तरी त्यातल्या पात्रांची परवड चटका लावून गेलीच. स्वत:च्या आयुष्याचं असं मातेरं करून घेण्यापेक्षा शब्बोने कोठी विकली असती तर बरं झालं असतं असंच वाटून गेलं. एखाद्याच्या आयुष्यापेक्षा एखादी वास्तू कशी मोठी असू शकते? हा विचार मनात आला आणि एकदम वाटून गेलं - हे असं वाटणं म्हणजे आपल्याही मूल्यांचा ह्रास आहे का हे आपल्या दृष्टीने कधी मूल्य नव्हतंच? रोजच्या धकाधकीत हे असले प्रश्न पडत नाहीत ते ह्या नाटकाच्या निमित्ताने तरी पडले हेच पुष्कळ आहे. :-(

नुकतंच "सारे प्रवासी घडीचे" देखील पाहिलं. खूप आवडलं. कोकण काय आहे हे कधी पाहिलंच नसलेल्या माझ्यासारखीला तिथलं वास्तव काय आहे ते माहित असूनही शेवट अंगावर आला. कुठेतरी चुकतंय पण काय चुकतंय आणि ते कसं निस्तरायचं हेच कळत नाहिये. ६० च्या घरात गेल्यावर शहर सोडून दूर कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात रहायचं एक धूसर स्वप्न आहे. पण शहरातच जन्मून लहानाचं मोठं झाल्यामुळे तिथे आपण रमू का हा प्रश्न दशांगुळं व्यापून उरतोच. सगळंच कठीण होऊन बसलंय असं वाटायला लागतं त्यामुळे. :-(

बाकी प्रयोग एकदम मस्त होता. सगळ्याच कलाकारांनी मन लावून काम केलं होतं. अशीच चांगली नाटकं बघायला मिळोत ही देवाकडे प्रार्थना!

No comments: