Sunday, April 7, 2019

८. भवताल (दिवाळी अंक २०१८)


मागच्या दिवाळीतला मी वाचत असलेला हा शेवटला अंक. हाही गेली काही वर्षं नेमाने घेतेय. प्रत्येक वर्षीचा अंक पर्यावरण-निसर्ग विषयक विषयाला वाहिलेला. ह्या वेळच्या अंकाचा विषय – महाराष्ट्रातल्या पारंपारिक जलव्यवस्थेचा मागोवा.

अंक ६ भागांत विभागलेला. प्रथम भागात जलव्यवस्थांच्या प्राचीनरूपांचा आढावा घेतलाय. ह्यात प्रथम भेटतो तो भीमा नदीच्या खोर्यातल्या पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वाच्या अश्या इनामगाव ह्या ठिकाणचा इसवीसनाच्याही दीड हजार वर्षं आधी खोदलेला कालवा. पाठोपाठच्या दोन लेखात सातवाहन काळापासून ते मध्ययुगापर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थांचा सुरेख लेखाजोखा वाचायला मिळतो. ह्या भागातला शेवटचा लेख रोम, इराण, चीन, इस्त्रायल अश्या जगातल्या इतर देशातल्या जलसंचयनाच्या पध्दती आपल्यासमोर उलगडतो. 

दुसरा भाग राज्यातल्या निवडक शहरांतल्या ऐतिहासिक जलव्यवस्थांची माहिती देतो. ह्यात आपल्याला भेटतात ते पोर्तुगीज-ब्रिटीश काळातले मुंबईचे तलाव, पाणपोया आणि विहिरी, अहमदनगरमधले हत्ती बारव, फराहबख्श आणि खापरी नळ, औरंगाबादमधले नहर-ए-अंबरी, थत्ते नहर, बंबा आणि पाणचक्क्या, साताऱ्यातले हत्ती, महादरे तलाव आणि कासचं धरण, पुण्यातल्या नहरी, हौद आणि उच्छवास, नागपुरातले तलाव आणि पायविहिरी आणि गोव्यातल्या नेत्रावळीची बुडबुड्याची तळी, मंदिराशेजारचे तलाव आणि कुळागरं. आपले पूर्वज किती शहाणे होते आणि आपण मात्र कपाळकरंटेपणा करून दुष्काळाचे चटके ओढवून घेतलेत हे जाणवून वाईट वाटतं. 

तिसर्या भागात राज्यातल्या पारंपारिक जलव्यवस्था उलगडून दाखवल्या आहेत. ह्यात खानदेशातली फड पध्दत, पूर्व विदर्भातली बोडी पध्दत, कोकणातले पाट, राज्यात ठिकठिकाणी विखुरलेल्या बारवा, स्वराज्यातल्या विविध किल्ल्यांवरची टाक्यांची व्यवस्था, बौध्द लेण्यांतून केलेल्या पाणीपुरवठ्याच्या सोयी ह्या सगळ्यांबद्दल वाचून हा अंक केवळ महाराष्ट्र सरकारच्याच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांच्या पाणीपुरवठा विभागाशी संबधित सर्व अधिकाऱ्यांनी वाचला आणि त्यावर विचार करून नियोजनपूर्वक काम केलं तर देशाचं किती भलं होईल हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. अर्थात पोकळ घोषणा खंडीने, प्रत्यक्ष काम काही नाही असाच सरकारचा खाक्या असल्याने हे स्वप्नरंजनच ठरणार ही देशाची शोकांतिका आहे.

असो. तर चौथा भाग इतिहासात प्रसिद्ध अश्या पाणीसाठा करणाऱ्या वास्तूंची ओळख करून देतो. त्यात बीडमधली खजाना बावडी, नांदेडमधला जगत्तुंगसागर तलाव, साताऱ्यातल्या लिंब गावाची बारा मोटेची विहीर, नळदुर्गाचा पाणीमहाल आणि रायगडावरची पाण्याची टाकी ह्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांबद्दल वाचायला मिळतं. देवाजीने कृपा केली तर ह्या सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जायला नक्की आवडेल.

पाचवा भाग त्यामानाने लहानखुरा. त्यात वाचकांना जलनियोजनाच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या मलिक अंबर, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज, एम. विश्वेश्वरय्या अश्या खास ऐतिहासिक व्यक्तीमत्त्वांची ओळख करून दिलेली आहे. प्रत्येक ओळख एक पानाचीच आहे. पण तेव्हढ्यावरून ह्या सगळ्यांबद्दल अधिक माहिती मिळवायची इच्छा वाचकाला नक्कीच होईल.

शेवटचा भाग वाचक म्हणून आपल्याला एकाच वेळेस खिन्न आणि आश्वस्त दोन्ही करून जातो. खिन्न अश्यासाठी की हाव, अनास्था आणि आळस ह्या दुर्गुणांपोटी आपण इतक्या समृद्ध जलव्यवस्थांची कशी वाट लावून टाकलेय ते ह्या विभागातला पहिलाच लेख आपल्याला सांगतो. पण पुढचे लेख मात्र सिन्नरमधल्या देवनदीचं पुनरुज्जीवन कसं सुरु आहे आणि पूर्व विदर्भातल्या मालगुजारी तलावांची डागडुजी करून त्यांच्या वापरारला पुन्हा कशी सुरुवात होतेय ते सांगतात. अजून आशेला जागा आहे तर.

भवतालच्या दरवर्षीच्या अंकासोबत वाचकांना एक अनोखी भेट असते. ह्यावेळी काय असेल ह्याची उत्सुकता होती. एक छोटी कुपी आणि आत पाणी दिसलं. अंकातल्या खुलाश्यावरून ते सिंहगडावरच्या देवटाक्याचं पाणी आहे हे कळलं. अत्यंत निर्मल आणि गोड चवीच्या पाण्यासाठी हे टाकं प्रसिद्ध आहे. २०१७ च्या अंकासोबत मिळालेली बियाणांची डबी मी अजून जपून ठेवलेय. अजून त्या बिया रुजत घालायला मुहूर्त मिळायचा आहे. तो लागला की प्रत्येक कुंडीत ह्या पाण्याचे काही थेंब घालेन म्हणते. 
माझी खात्री आहे की झाडं नक्की जोमाने वाढतील. :-)

No comments: